प्रियंका मोहितेला केंद्र सरकारचा 'टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड' जाहीर
सातारा : साताऱ्याची 'शिखर कन्या' अशी ख्याती मिळवलेल्या प्रियंका मोहितेला केंद्र सरकारकडून 'टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवॉर्ड' जाहीर झाला आहे. प्रियंकाला हा पुरस्कार जाहीर होताच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. अतिउच्च अन्नपूर्णा शिखर सर केल्यानंतर प्रियंकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रियंकाचा सन्मान होणार आहे. या यशाबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रियंकाचा सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्यात.
केवळ छंद म्हणून नव्हे तर पॅशन म्हणून अनेक शिखर आणि पर्वत सर करणाऱ्या प्रियंकाला अर्जुन अवॉर्ड सारखा पुरस्कार मिळाला असून त्यामुळे साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. पुरस्कार मिळाला म्हणून ती थांबणारी नाही, तर तिची नवीन यादी तयार असेल आणि आगामी काळात ती यादीत नमूद सर्व शिखरे पदांक्रांत करेल अशा शुभेच्छा सातारकरांच्या वतीने देतो, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रियांकाचे कौतुक केले.