आश्रमशाळेतील शिक्षक गेल्या २० वर्षापासून अनुदानापासून वंचित...
राज्यातील जवळपास १६५ आश्रमशाळांना गेल्या २० वर्षापासून राज्यसरकारकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळालेले नाही. या सर्व शाळांना अनुदान मिळावे, यासाठी आश्रमशाळेतील शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहेत.;
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने राज्यभरात सुरु असलेल्या १६५ आश्रम शाळांना सरकारी अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण पुकारले आहे. गेल्या 20 वर्षांपासून हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वेतनश्रेणी प्रमाणे अनुदान या सुविधेपासून वंचित आहेत. आणि त्यांचा यासाठी लढा कायम आहे. त्याचप्रमाणे या १६५ शाळांना वि.जा.भ.ज. (VJNT) आश्रमशाळांची शाळा संहिता लागू करावी, अशा प्रमुख मागण्या घेऊन हे शिक्षक उपोषण करत आहेत. हा आमचा शेवटचा लढा असून, या पुढचे निर्णय आम्ही घेऊ असा इशारा या आंदोलकांनी सरकारला दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आश्रमशाळेतील शिक्षकांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणकर्त्यांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी राज्य सरकारला वेळ नसल्याचे दिसून येतेय. आज या उपोषणकर्त्यांनी राज्य सरकारला इशारा देत आवाहन केले आहे की, आगामी एक-दोन दिवसात जर राज्य सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर यापुढे आम्ही मंत्रालयात घुसायला सुद्धा मागे पुढे पाहाणार नाही. आणि त्यावेळी आमच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशाराच उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
राज्य सरकारला आपल्या विविध उद्घाटन आणि कार्यक्रमातून वेळ मिळाला तर या शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष देता येणार आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील १६५ आश्रम शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणार आहेत का? हाखरा प्रश्न आहे.