Tardeo Fire : अखेर ताडदेव भागातील आगीवर नियंत्रण, 7 लोकांचा मृत्यू

मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या जवळच असलेल्या कमला इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तर या आगीत 7 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Update: 2022-01-22 12:42 GMT

ताडदेव भागातील नाना चौक येथील भाटिया हॉस्पिटलच्या समोरच्या कमला इमारतीला लागलेल्या आगीत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तर या भीषण आगीच्या दुर्घटनेच्या कारणाचा तपास केला जात असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.

कमला इमारतीला भीषण आग लागल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांशी चर्चा केली. त्याचबरोबर मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नेमकी परिस्थिती आणि मदतकार्य याबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्याठिकाणच्या रहिवाशांशी बोलून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटूंबियांना सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार असल्याचे सांगितले. तर जखमींवर उपचार करण्यासाठी दोन रुग्णालयांनी नकार दिला होता. मात्र त्यानंतर त्यांनी जखमींना उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले.

मुंबईतील ताडदेव दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत निधी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली.

Tags:    

Similar News