तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक, पुतण्याच्या लस वादावर फडणवीसांचं स्पष्टीकरण...
देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षाच्या पुतण्याला लस देण्यात आल्यानं सध्या फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर मोठी टीका करण्यात आली. त्यानंतर हा फोटो डीलिटही करण्यात आला आहे.
देशात 45 वर्ष वयोगटापुढील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. मात्र, तन्मय फडणवीस यांचं वय 25 असताना लस दिल्यानं फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणावर फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे. असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे.
कोण आहे तन्मय फडणवीस?
तन्मय फडणवीस हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे असून राज्याच्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे ते नातू आहेत. या संदर्भात Indian Express ने उत्तर दिलं आहे.