आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून 'स्वराज्य ध्वज पूजन यात्रा'

Update: 2021-09-09 05:28 GMT

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून 'स्वराज्य ध्वज पूजन यात्रा' आयोजित करण्यात आली. या यात्रेचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून करण्यात आला. यानिमित्त एक भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती.या शोभायात्रेत पारंपरिक नऊवारी साडीतील सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक धनगरी डफ स्वतः हातात घेऊन आ.रोहित पवार हे देखील या शोभायात्रेत सहभागी झाले. ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिरात वंदन करून शोभायात्रा पुढे शिवनेरी किल्ल्याकडे रवाना होणार आहे. शोभायात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त घेतला. मात्र एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नका असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते, या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिसाद दिल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले असताना दुसरीकडे मात्र आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन होत असलेल्या या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

लोकसभा-विधानसभा निवडणूकिवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रचारसभा व्यासपीठावर, मिरवणुकात भगवा ध्वज लावण्याची संकल्पना घोषित केली होती. त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया आल्या होत्या. भगवा ध्वजावरून पक्ष प्रमुख शरद पवारांनी आपले वेगळे मत व्यक्त केले होते. आता अजितदादांनंतर शरद पवार यांचे नातू कर्जत-जामखेडचे आ.रोहित पवार यांनी भगवा ध्वजाची संकल्पना नव्या रुपात मांडून त्यास ऐतिहासिक आणि धार्मिक जोड देत भगव्याला पुन्हा पक्षाच्या भूमीवर घेतले आहे.




 


अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याचा भुईकोट किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकारण्यात येणार आहे. प्रेरणा, ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज त्या ठिकाणी फडकवण्यात येणार आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट असून वजन ९० किलो आहे. हा राज्यातीलच नाही तर जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज असणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होणार आहे.

Tags:    

Similar News