शेतकऱ्यांनी कसे जगायचे? : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापूरमधील एका शेतकऱ्याला १० पोती म्हणजे जवळपास ५०० किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांचा चेक मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. आणि या अनुभवावर शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आणि राज्यकर्त्यांनी याची लाज बाळगली पाहिजे, अशी टिका केली.
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. आणि हे चित्र संपूर्ण राज्यात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सोयाबीन, कापूस, तूर, कांदा इत्यादी शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याची ओरड सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी बाजारात चांगला दर मिळेल, या आशेने सोयाबीन, कापूस, तूर, कांदा घरीच साठवून ठेवला आहे. मात्र त्यांच्या कांद्याला सुद्धा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालाला कमी दर मिळत असल्याने मार्च अखेरीपर्यत बँकेचे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला माल कमी दरात बाजारात विकावा लागत आहे. एका शेतकऱ्याने आपला १० पोती कांदा व्यापाऱ्याला अवघ्या ५१२ रुपयाला विकला आणि त्यातून सर्व वजावट करुन शेतकऱ्याच्या हातात फक्त २ रुपयांचा चेक देण्यात आला. हा चेक सुद्धा १५ दिवसाच्या पुढचा देण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. राजेंद्र चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने ५१२ किलो कांदा व्यापाऱ्याला विकला.
त्याचं बील १ रुपये दरांप्रमाणे ५१२ रुपये झाले. हमाली, तोलाई, भाडे, रोख उचल वजा करुन ५०९.५१ रुपये कापून घेण्यात आले. त्यातून राहिलेली २.४९ रुपयांची रक्कम देण्यासाठी शेतकऱ्याला केवळ २ रुपयांचा चेक देण्यात आला. आणि यावर कहर म्हणजे व्यापाऱ्याने शेतकऱ्याला २ रुपयांसाठीचा चेत ८ मार्चचा दिला आहे. तो चेक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आहे. या चेकवर ८ मार्च २०२३ ही तारीख टाकण्यात आली आहे. या सर्व प्रकाराचा राजू शेट्टी यांनी निषेध आणि संताप व्यक्त केला आहे.