`अर्नब` ला आणखी एक दणका
बेजबाबदार आक्रस्ताळ्या पत्रकारीता करणाऱ्या रिपब्लिक टिव्हीच्या अर्नब गोस्वामीला आता एकापोठापाठ दणके बसत आहे. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर विधीमंडळाने दुसऱ्यांदा अर्नबविरोधात हक्कभंग दाखल केल्यानंतर आता सुशांतसिंग राजपूतच्या मित्र संदिपकुमार सिंहने रिपब्लिक टीव्ही अर्नब गोस्वामीला कायदेशीर नोटीस पाठवून 200 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
अभिनेता सुशांतसिंग आत्महत्येचे टिआरपीसाठी भांडवल करुन प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता लयाला नेणाऱ्या रिपब्लिक टिव्हीच्या अर्नब गोस्वामीच्या सर्व बाजूनी मुसक्या आवळल्या जात आहे. मुंबई पोलिसांनी पालघर साधु हत्या वृत्तांकन आणि टिआरपी घोटाळ्यावरुन रिपब्लीकच्या चौकशीचे सत्र आरंभले असताना महाराष्ट्र विधीमंडळाने अर्नबला दुसऱ्यांदा हक्कभंग नोटीस पाठविली आहे. भरीस भर म्हणजे आता सुशांतसिंग राजपूतच्या मित्र संदिपकुमार सिंहने रिपब्लिक टीव्ही अर्नब गोस्वामीला कायदेशीर नोटीस पाठवून 200 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
अर्नब रिपब्लिक टिव्ही वाहिनीवर संदिपकुमार सिंहबाबत बदनामीकारक वृत्ताकन केल्याचा आरोप केला आहे. सर्व वृत्ताकंन डिलीट करुन माफी मागावी आणि 200 कोटीची नुकसान भरपाई मागण्यात आली आहे. विधीमंडळाने पावसाळी अधिवेशनात अर्नब गोस्वामीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख आणि सरकारची विनाधार बदनामी केल्याच्या आरोपाखाली हक्कभंग नोटीस पाठवली होती. या नोटीससोबत विधिमंडळाने अर्नब गोस्वामी यांना माहितीसाठी त्या दिवशीचे कार्यवृत्त देखील गोपनीयतेच्या अटी-शर्ती घालून दिले होते. या अटी शर्तींनुसार विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयीन अथवा इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरता येऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं होतं.
अर्नब गोस्वामी यांनी पहिल्या हक्कभंगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवायच विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयात सादर केले. त्यामुळे अर्नब गोस्वामी कायदेशीर पेचात अडकण्याची दाट शक्यता आहे. विधीमंडळाने अर्नब गोस्वामी यांची ही कृती विधीमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे सांगत पुन्हा नोटीस दिली आहे. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांनी २०१८ मध्ये अलिबागमधील काविर गावातील त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आत्महत्येपूर्वी अन्वय यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आत्महत्या करत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा विधीमंडळात केली होती. रिपब्लिक भारत या हिंदी वृत्तवाहिनीवरील 'पूछता है भारत' आणि रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील 'द डिबेट' हे अर्णब गोस्वामी यांचे दोन प्राइम टाइम शो कचाट्यात सापडले आहेत.
पालघरमधील साधूंच्या हत्येनंतर या शो च्या माध्यमातून अर्णब यांनी प्रक्षोभक वक्तव्ये केली होती. हिंदू-मुस्लीम समुदायात तेढ व द्वेष निर्माण करणारी ही विधाने असल्याचे नमूद करत याप्रकरणी नितीन राऊत यांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याआधारे पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच अर्णब गोस्वामी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवर अर्णब गोस्वामी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असे लेखी बंधपत्र द्यावे लागणार आहे तसेच १० लाख रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहेत.
जामीनदार अर्णब यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे हवेत, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. टीआरपीशी संबंधित एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून झालेला टिआरपी घोटाळा उघड झाला आहे. चॅनेलचे रेटिंग वाढवण्यासाठी पैसे देण्यात आले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. या घोटाळ्यात फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्हीचा समावेश असल्याचे पुरावे हाती लागले असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले होते.
टीआरपी घोटाळ्यात आता मुंबई पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून याप्रकरणी अटकेतील आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ४०९ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानेच रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ सुंदरम यांना क्राइम ब्रांचने समन्स बजावले होते. पोलिसांनी रिपब्लिकच्या चार आणि हंसा कंपनीच्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. या सहा जणांपैकी तिघांची पोलिसांनी रविवारी चौकशी केली. रिपब्लिक नेटवर्कचे सीईओ विकास खानचंदानी, मुख्य ऑपरेटर अधिकारी हर्ष भंडारी यांची पोलिस मुख्यालयात आठ ते नऊ तास चौकशी करण्यात आली.
तर, वितरक विभागप्रमुख घनःश्याम सिंग यांची दमण येथे जाऊन चौकशी करण्यात आली. वाहिनीला मिळालेले उत्पन्न तसेच यासंदर्भातील इतर कागदपत्रे सादर करण्यास या तिघांना सांगण्यात आले आहे . दरम्यान, रिपब्लिकचे सीएफओ शिवा सुब्रमण्यम सुंदरम आणि मुख्य ऑपरेटर अधिकारी प्रिया मुखर्जी यांनी मुंबईत आल्यावर चौकशीला हजर राहणार असल्याचे पोलिसांना कळविले आहे. एकंदरी सत्ताधा-यांची तळी उचलून विरोधकांनी लक्ष करुन एकांकी पत्रकारीता करणाऱ्या रिपब्लिकन वृत्तवाहीनी आणि अर्नब गोस्वामी यांचे सहकारी आता चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत.