मनोज जरांगेंची पायी यात्रा मुंबईच्या दिशेने सरकत आहे. अशात महाराष्ट्र सरकारच्या हालचालींना वेग आल्याच दिसत आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध करत मराठा अरक्षणा संदर्भात एक महत्वाची माहिती पुढे आली आहे. ज्यात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. हे सर्वेक्षण शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत होणार असून, या सर्वेक्षणास आज पासून सुरुवात होणार आहे व ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण होईल अशी माहिती प्रसिद्धी पत्रात दिली आहे.हे सर्वेक्षण अधिकारी वर्गाच्या माध्यमातून होणार असून यासाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत.
नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.
सर्वेक्षणा दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नसल्याच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच म्हणण आहे. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. अशात
नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करण्याच आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात केल आहे.