संभाजी भिडे यांच्या कुंकू लाव वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट
संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन, असं विधान केलं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांची बुरटलेल्या विचाराला चपराक लगावणारी पोस्ट केली आहे.;
संभाजी भिडे यांनी मंत्रालय परिसरात महिला पत्रकाराविषयी वक्तव्य केलं होते. यावेळी भिडे गुरूजी म्हणाले की, आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो. या वक्तव्यानंतर संभाजी भिडे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांनी लिहीलेली कविता पोस्ट केली आहे.
तू आणि मी ....
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल
तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो
मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का...!!!
मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास .....!!!!!
हेरंब कुलकर्णी