सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष पद, अजित पवार यांना का डावललं? शरद पवार यांनी दिले स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अखेर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली. मात्र यामध्ये अजित पवार यांना डावलल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर अखेर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांना काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्याकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे एका व्यक्तीकडे एकच जबाबदारी देण्याचे पक्षाने ठरवले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या संमतीनेच प्रफुल पटेल यांची आणि सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज असण्याचे काही कारण नाही, असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.