लखीमपूर खेरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, योगी सरकार आरोपींना अटक करणार का?
सर्वोच्च न्यायालयाने लखीमपूर खेरी घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी होणार आहे. लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या घटनेबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार च्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
देशातील सर्व विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच राजकीय विश्लेषकांनी आणि सामान्य लोकांनीही केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणात दोषींवर कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
अटक कधी होणार?
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे चिरंजीव आशिष मिश्रा यांना अद्याप अटक का केली गेली नाही? असा प्रश्न विरोधक करत आहे. आशिष मिश्रा खुलेआम टीव्ही वाहिन्यांना बाईट देत आहेत, त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, उत्तर प्रदेश पोलीसांनी त्याला अद्यापर्यंत अटक केलेली नाही.
टेनींचा राजीनामा कधी?
या व्यतिरिक्त, आणखी एक मोठा प्रश्न केला जात आहे तो म्हणजे केंद्र सरकार अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा कधी घेणार. टेनी पदावर असताना या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यातच टेनी यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रालयातील राज्यमंत्री पद असल्यामुळं शेतकऱ्यांच्या या युक्तीवादात वजन देखील आहे. त्यामुळं टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
व्हिडिओने योगी सरकारचा खेळ पालटला
योगी सरकारने शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून हा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण एका नव्या व्हिडीओने योगी सरकार बॅकफूटवर गेलं आहे. या व्हिडिओमध्ये एक कार शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे आणि या व्हिडीओमध्ये एक तरुण या गाडीतून पळून जाताना दिसत आहे. हा पळून जाणारा मुलगा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा असल्याचं बोललं जात आहे. जर ही व्यक्ती प्रत्यक्षात आशिष मिश्रा असल्याचे तपासात सिद्ध झाले, तर भाजप आणि त्यांचे मंत्री खोटं बोलत असल्याचं समोर येणार आहे.
काय आहे प्रकरण?
रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.