राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. त्यातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली होती. त्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. तर यामध्ये शिवसेनेना एमआयएमला खूश करण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर केले जात नसल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशनातही भाजपकडून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर आता त्यापाठोपाठ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ऑफर दिली होती. त्यावरून बोलताना शिवसेनेने एमआयएमसोबत आघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र भाजपने यावरून शिवसेनेवर टीका केली आहे.
सुधीर मुनगंटीवार हे जळगाव येथे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले असताना बोलत होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी एमआयएमला खूश ठेवण्यासाठी आमच्या शेर संभाजी राजांचे नाव औरंगाबाद शहराला दिले जात नाही, असा आरोप शिवसेनेवर केला. तर 2015-16 साली आमचे सरकार असताना याबाबत प्रस्ताव आणला होता. मात्र आता शेवटचा प्रस्ताव मंत्रीमंडळासाठी आहे. मात्र तरीही औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात येत नाही.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आम्हाला विचारले जाते की, तुम्ही पाच वर्षे सत्तेत असताना काय केले? त्यामुळे या प्रश्न विचारणारांना सांगायचं आहे की, नामांतरासाठी पोस्ट ऑफिस पासून ते विविध खात्यांची एनओसी आवश्यक असते. ती मिळवून यावेळी सत्ता स्थापन केल्यानंतर नामांतर करण्याचा प्रस्ताव होता. मात्र सत्ता आमच्या हातून गेली. त्यामुळे हा प्रस्ताव सध्या मंत्रीमंडळासमोर आहे. तर खरेच शिवसेना एमआयएमच्या विरोधात असेल तर त्यांनी दोन दिवसात हा प्रस्ताव मान्य करून नामांतराचा प्रश्न मार्गी लावावा, असे आव्हान मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिले. तर या अधिवेशनात मी पुन्हा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.