एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. कोरोनानंतर शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला. गेल्या 17 दिवसांपासून कोल्हापूरमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. खेड्यापाड्यात जाणारी लालपरी एका जागेवर थांबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात शाळा, महाविद्यालये या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.
आता कुठे राज्यसरकारने शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे. त्यामुळे अद्यापही शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी पोहोचू शकत नाहीत. अशावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून एसटीची सेवा पूर्ववत करावी, यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी कोल्हापूर बसस्थानकात आंदोलन केले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या अशी मागणी देखील केली.