ऑफलाईन परीक्षेविरोधात शिक्षणमंत्र्यांच्या घरावर विद्यार्थ्यांचा मोर्चा, पोलिसांचा लाठीमार
कोरोना संकटाच्या पार्श्वभमीवर राज्यात गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने शाळा आणि कॉलेज सुरू आहेत. मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने आता शाळा आणि कॉलेज ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याचा निय सरकारने घेतला आहे. तसेच परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी आता विद्यार्थी करु लागले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार नसुन ऑफलाईनच होणार आहेत असे स्पष्ट केले आहे. याच विरोधात मुंबईत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीमधील घराबाहेर आंदोलन केले.
मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले होते, कोरोना नियमांचे देखील उल्लंघन या ठिकाणी झालेले दिसले. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी लाठीमार करावा लागला. मुंबईसह नागपुर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. शाळा ऑनलाईन झालेल्या असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. तर विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे कोणी आहे का?अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
तर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील. विद्यार्थी संख्या बरीच जास्त असल्याने ऑनलाइन परीक्षा शक्य नाही. असं राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थांची परीक्षा मार्च १५ एप्रिल पासुन तर बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासुन सुरु होणार आहेत.