पुणे विदयापीठाचा अजब कारभार, वर्षभरात १७ लाखांचा हिशेब कसा चुकला?
दीड वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठातील स्वच्छ वारी निर्मल वारी 2019 हा कार्यक्रम भ्रष्टाचाराच्या आऱोपामुळे गाजला होता. पण आता याप्रकरणात आणखी एक धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.;
पुणे विद्यापीठात दीड वर्षांपूर्वी झालेला वृक्ष लागवडीचा वादग्रस्त कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तत्कालीन मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवल्या गेलेल्या या कार्यक्रमात कडूनिंबाची 17 हजार रोपटी लावण्यात आली होती. यासाठी 3 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण यामध्ये विद्यापीठात गैरकारभार झाल्याचा आरोप स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा या कार्यक्रमासंदर्भात कुलदीप आंबेकर यांनी नवीन आरोप केला आहे.
नवीन आरोप काय आहे?
पुणे विद्यापीठाने या कार्यक्रमासाठी 3 कोटी 40 लाख रु. तरतूद होती. यात अडीच कोटी रुपये प्रायोजकांनी दिले होते तर ६८ लाख रुपयांची तरतूद विद्यापीठाने केली होती. विद्यापीठाने कुलदीप आंबेकर यांना २०१९मध्ये माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाने कार्यक्रमासाठी ५३ लाख 66 हजार 559 रुपये खर्च झाला होता.
पण त्यानंतर याच कार्यक्रमाची माहिती आणखी एका व्यक्तीने यावर्षी मागितल्यानंतर १८ डिसेंबर रोजी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार 35 लाख 95 हजार 522 रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे.
यावरुन वर्षभरात १७ लाख रुपये कमी कसे झाले असा सवाल कुलदीप आंबेकर यांनी विचारला आहे. त्याचबरोबर प्रायोजकांकडून अडीच कोटींची देणगी घेऊनही कार्यक्रमाचा खर्च फक्त काही लाखात झाला असेल तर त्या देणगीचे काय झाले याचे उत्तरही विद्यापीठाने दिले नसल्याचा आरोप कुलदीप आंबेकर यांनी दिला आहे.
विद्यापीठाचे म्हणणे काय?
या संदर्भात आम्ही पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना संपर्क साधला तेव्हा, त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसंच आपल्या कार्यालयाला रितसर पत्र पाठवा मग त्यावर उत्तर दिले जाईल असे सांगितले.