दरवेळी १५ कोटी कोठून आणू? , भाजप खासदार डॉ सुजय विखे यांचं वक्तव्य
दरवेळी डॉ. तनपुरे साखर कारखाना सुरू करण्यासाठी 15 कोटी कोठून आणू अस म्हणत खा.सुजय विखे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नसल्याचे म्हंटले आहे;
राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यास मी कटिबद्ध आहे. मात्र, त्यासाठी कारखाना संचालक मंडळाला राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ द्यावी तरच मी कारखाना चालविण्यास तयार आहे असा पुनरूच्चार नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे यांनी केला. वांबोरी येथे डॉ. तनपुरे कारखान्याबाबत खा. डॉ. विखे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होतेे.
राहुरीच्या डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दि. 26 जूनला संपलेली आहे. या संचालक मंडळाला दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम हा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. त्यासाठी दरवर्षी किमान 10 कोटी रुपये खर्च येतो. मात्र, सध्या कोणतीही बँक डॉ. तनपुरे कारखान्याला एकही रुपया कर्ज देण्यास तयार नाही. अस सांगतांनाच खासदार डॉ विखे यांनी "मी वैयक्तीक घरातून 15 कोटी रुपये खर्च केला आहे. प्रत्येक वेळेस कारखाना सुरू करण्यासाठी पैसे आणायचे कोठून?" असं म्हंटल आहे.
दरम्यान त्यावेळी खासदारकी मिळवायची होती मात्र आता ती मिळाली असल्यानेच खासदारांनी हे वक्तव्य केलं असावं अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे.
दरम्यान यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले , ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील, कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, शामराव निमसे, सुरसिंग पवार यांची उपस्थिती होती.