आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आता संपाचा हत्यार उगारले आहे. गुरूवारपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. महागाई भत्ता २८ टक्के करण्यात यावा, दोन टक्क्यांवरून तीन टक्के वार्षिक वेतनवाढ करण्यात यावी. दिवाळीच्या आधी पगार देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आता उपोषणाला सुरूवात केली आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
बीड जिल्ह्यात सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देत कामबंद केल्याने सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच आगारात बससेवा ठप्प झाली आहे. केवळ इतर जिल्ह्यातून आलेल्या गाड्य़ा रवाना झल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यभर काम बंद करून उपोषणाला सुरुवात केली आहे, पण सरकारने याची दखल घेतली नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासह बुलडाणा जिल्ह्यातील एकाही आगारातून एकही बस आगाराच्या बाहेर निघालेली नाही. कुठलीही पूर्वकल्पना न देता कर्मचाऱ्यांना बंद पुकारल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. ऐन दिवाळीच्या हंगामात कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.