राज्यस्तरीय हळद कार्यशाळा : हळदीच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज
हळद उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, शेतकऱ्यांना कसे मार्गदर्शन झाले पाहिजे यावर चर्चा करण्यासाठी नुकतीच एक राज्यस्तरीय हळद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचे अध्यक्ष आणि खासदार हेमंत पाटील यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.या एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच हळद लागवडीचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे मत दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. हळद काढणी ते गुणवत्ता वाढ, मार्केटिंग आणि एक्सपोर्ट अशा विविध विषययांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी यामध्ये मार्गदर्शन केले.
"या कार्यशाळेतून नक्कीच चांगले आणि महत्वाचे मुद्दे समोर येतील ज्यांचा उपयोग भविष्यात राज्यातील हळदीचे उत्पादन वाढविण्यासाठी उपयोगी येतील, हळद धोरण अभ्यास समितीने अहवाल सादर केल्यास याबाबतचे पुढचे धोरण आखायला मदत होईल" असे दादा भुसे यांनी व्यक्त केले. तर
तर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू स्पष्ट करताना खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले की, "हळद पिकाला मसाले, सौंदर्य प्रसाधने, औषधी उत्पादनात मागणी वाढत आहे. अत्यंत कमी कालावधीत कमी खर्चात हे पीक शेतकऱ्यांना मोठा फायदा देऊन जाणारे आहे. त्यामुळे यावर होणारा खर्च आणखी कमी कसा करता येईल आणि शेतकऱ्यांना हळद काढणीच्या वेळी होणाऱ्या अडचणी कशा सोडवता येतील हा या कार्यशाळेमागचा उद्देश आहे. हळद हे नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा याकडे कल असून भविष्यकाळात तो आणखी वाढावा यासाठी देशपातळीवर कार्य करणारे शास्त्र संशोधक यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला जाईल" असे त्यांनी सांगितले.