मॅग्नेटिक महाराष्ट्र - २ : उद्योगव्यवसायांना चालना देण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न , १६ उद्योजकांना भूखंडांचे वाटप, ११ जणांना ताबा
मुंबई // कोरोनामुळे अडचणीत आलेल्या राज्यातील उद्योगव्यवसायांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने ५९ उद्योगांसाठी केलेल्या सामंजस्य करारांपैकी २७ उद्योगांचा जमिनीचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य सरकारकडून १६ उद्योगांना भूखंड वाटप तर ११ उद्योगांना जमिनीचा ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अर्थचक्राला गती व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
मागील वर्षापासून जगभरात कोरोनामुळे अर्थचक्र मंदावल्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील झाला व उद्योगव्यवसाय अडचणीत आले. राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे तसेच नवीन गुंतवणूक वाढवण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र २' हा उपक्रम हाती घेतला आहे. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र २' अंतर्गत उद्योग विभागाने जून २०२० ते ऑक्टोबर २०२१ या काळात १ लाख ६७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील औद्योगिक वसाहतींमध्ये २२ हजार १४२ कोटी रुपयांची नियमित गुंतवणूक आली. त्यामुळे जवळपास एकूण ३ लाख ९ हजार ५४२ जणांना रोजगार मिळणार आहे.