सचिन वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची कोंडी झालेली असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सचिन वाझे प्रकरणात चौकशी अंती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका हीच सरकारची भूमिका आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक सोमवारी घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसून सरकार स्थिर असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.