एका पोलीस इन्स्पेक्टरच्या अटकेवरुन राज्य सरकारवर परिणाम होईल असे आम्हाला असे वाटत, या शब्दात शरद पवार यांनी महाविकास आघाडीमधील मतभेदांच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल आणि कुणी अधिकाराचा गैरवापर केला असेल तर कारवाई होईल असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये या मुद्द्यावरुन कोणतेही मतभेद नाहीत,सरकार स्थिर आहे. काही अडचणी आल्या तर आम्ही बसून चर्चा करुन त्या सोडवतो, असे सांगत शरद पवार यांनी राज्य सरकारच्या स्थिरतेवर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसचे नेते पी.सी.चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुकेश अंबानींच्या घरापुढे स्फोटकं सापडल्यापासून ते सचिन वाझेंवरील कारवाईपर्यंत गृहखात्याने उत्तम काम केल्याचे सांगत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे अनिल देशमुख यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच पोलीस आय़ुक्तांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री निर्णय घेत असतात, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारा असे उत्तर शरद पवार यांनी यासंदर्भातल्या एका प्रश्नाला दिले.