डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या शाळेची चौकशी, राज्यमंत्री बच्चू कडू यांचा दणका
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात शाळांच्या मनमानी फी वसुलीवरुन पालकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. आता सरकारने खासगी शाळांची फी १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. पण त्याची अंमलबजावणी कशी होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच आता काही शाळा डोनेशनच्या नावाखाली पालकांची लूट करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नवी मुंबईतील नेरूळ येथील Apeejay स्कूलमार्फत पालकांकडून तब्बल १ ते सव्वा लाख रुपय डोनेशन घेतले गेल्याचा आरोप झाला आहे. अजय तापकीर यांनी आपल्या मुलीच्या प्रवेशासाठी हे डोनेशन भरले आहे. त्यांनी हे ऑनलाईन डोनेशन भरले असल्याने त्यांच्याकडे शाळेविरुद्ध पुरावे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण हे डोनेशन ऑनलाईन भरले असल्याचे सांगत टेकाडे यांनी त्याचे पुरावे देखील सादर केले आहेत. त्यांच्या या तक्रारीची दखल शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. तसेच शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act,1987 अंतर्गत अनुदानित किवा विनानुदानित शाळेत शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे फौजदारी गुन्हा आहे. पालक अजय तापकीर यांनी त्याची मुलगी कथा तापकीर याच्या शाळा प्रवेश वेळी दिलेली डीडी व ऑनलाईन पेमेंट याची झेरॉक्स पुरावा म्हणून जोडला आहे, अशी माहिती प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष एड. मनोज टेकाडे यांनी दिली आहे.
Apeejay स्कूलचे प्राचार्य व संस्थाचालक यांच्यावर The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act,1987 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून पालकांचे पैसे परत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने Apeejay स्कूलशी दोनवेळा संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फोन घेतला नाही. शाळेने आपली बाजू मांडल्यानंतर या बातमीमध्ये अपडेट करण्यात येईल.