जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला होता. राज्य सरकारने त्यानंतर पंचनामे करुन मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने नुकसान भरपाईत वाढ केली आहे. त्यानुसार फरकासह वाढीव नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बागायती पिकांसाठी आता प्रति गुंठा 150 रूपये, जिराईतसाठी 100 तर बहुवार्षिक पिकांसाठी अडीचशे रुपये मिळणार आहेत.18 कोटी 57 लाख ही वाढीव फरकाची रक्कम येत्या 2 दिवसात प्रशासनाकडे वर्ग होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत तटपुंजी असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते, त्यांनी या पार्श्वभूमीवर पंचगंगा परिक्रमेचं आयोजन केलं होतं. आता एसडीआरएफकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या मदतीवर राजू शेट्टी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.