अहमदनगर : शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाळ्यामध्ये नागरिकांचे हाल होत आहेत. या प्रश्नावर आवाज उठवत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे आज महापालिकेवर आसूड मोर्चा काढण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थितीत होते.
महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाले. राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्र येत महापौर, उपमहापौर पद मिळविले. त्यातच काँग्रेसने मागील अडीच वर्षांच्या भाजप, राष्ट्रवादीच्या सत्ता काळातील निष्क्रिय कारभाराची 24 मुद्द्यांची श्वेतपत्रिका प्रकाशित केली. मनपातील सत्तांतरानंतर काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे नगर शहरातील महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपसह सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळत असताना काँग्रेसने मात्र नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे.