मुंबई : सर्वसामान्यांची लालपरी पुन्हा धावू लागली आहे.काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. एस.टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री परब यांनी सांगितलं.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एकुण तीन मागण्या होत्या. नव्या वेतन करारानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून मिळावा या दोन प्रमुख मागण्या होत्या. तर वेतन करारातील पगारवाढीचा मुद्दा आहे त्यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येईल असं परिवहन मंत्री परब यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असंही आवाहन परब यांनी केलं.त्यानुसार हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.