सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामध्ये आढळला, दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ
कसा आहे हा फ्रॉग माउथ पक्षी, कुठं आढळतो हा पक्षी? या पक्षाची वैशिष्ट्ये काय? पक्षी मित्रांसाठी पर्यावरण दिनानिमित्त ‘डिस्कवर कोयना टीम’ ने शोधलेल्या या पक्षाचं दुर्मीळ चित्रण नक्की पाहा...;
कोयना परिसर जैव विविधतेसाठी प्रसिध्द आहे. या जंगलामध्ये दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती, सरपटणारे प्राणी, कीटक यांच्या संरक्षणासाठी कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्रप्रकल्प ची स्थापना झाली. स्थापना झाल्या पासून प्रत्येक क्षेत्रात संशोधन करणारे संशोधक कोयना भागात येऊन स्थानिकांच्या मदतीने संशोधन करतात.
यातून प्रेरणा घेत येथील स्थानिक तरुण एकत्र येऊन 'डिस्कवर कोयना' आणि 'सह्याद्री सोशल फौंडेशन' संस्थेमार्फत या प्रकारचे संशोधन, निरीक्षण, अभ्यास स्वतः करत आहेत. त्यातून विविध वन्यजीवांच्या नोंदी त्यांनी घेतलेल्या आहेत .
सहसा दिवसा नजरेस न पडणारा दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (बेडूक तोंड्या) हा पक्षी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य तथा सह्याद्री व्याघ्र राखीवच्या कोयना परीसरामध्ये पक्षी निरिक्षकांना आढळून आला.
डिस्कवर कोयना टीम चे सदस्य पक्षी मित्र संग्राम कांबळे, निखिल मोहिते, नरेश शेलार, संकेत मोहिते, महेश शेलार, हे गेली दीड ते दोन वर्षापासून अनोळखी पक्षाचा आवाज ऐकत होते.
पक्षी अभ्यासातील सातत्य, आणि निरीक्षण असल्याने संग्राम यांनी हा आवाज श्रीलंकन फ्राॅग माउथ '(बेडूक तोंड्या) या पक्ष्याचा असल्याचा अंदाज बांधला. परंतु त्याचा फोटो उपलब्ध होत नव्हता.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळ असल्याने पक्षी मित्रांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. परंतु जोडधंदा म्हणून शेतीची कामे करत असताना आपला छंद ही जोपासला जात असल्याने कॅमेरा सतत सोबत असायचा . अश्यातच पावसाळी वृक्षारोपणासाठी मागवलेली रोपे संध्याकाळच्या वेळी उतरवून ठेवताना अंधार पडला. हे जाणवत होते. त्यावेळी पुन्हा तो आवाज ऐकू आला आणि आज पक्ष्यांच्या यादी मध्ये नवीन प्रजातीची नोंद करायचीच ह्या प्रेरणेने संग्राम, निखिल आजूबाजूला शोध घेऊ लागले आणि अथक परिश्रमाने संग्राम आणि निखिल यांच्या कॅमेरा मध्ये अखेर दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ चा फोटो कैद झाला.
गेली दीड दोन वर्षापासूनच्या परिश्रमाला यश आले होते .
कसा असतो श्रीलंकन फ्रॉग माऊथ?
हा पक्षी निशाचर असून त्याचे शास्त्रीय नावं Batrachostomus moniliger असे असून तो खाद्य शोधासाठी रात्रीच बाहेर पडतो. दिवसा घनदाट जंगलात विश्रांती घेत असतो. साधारणपणे त्याच्या शरिराची लांबी २२ ते २३ सेंटीमीटर असते. कीटक हे त्याचे आवडते खाद्य आहे. नर पक्ष्याचा संपूर्ण शरीराचा रंग हा वाळलेल्या लाकडाच्या सालीसारखा राखाडी असतो. मादी ही बदामी रंगाची असते. पंखाच्या बाजूने व पाठीमागे बदामी रंगावर पांढरे ठिपके असतात. बेडकाच्या तोंडासारखे तोंड असलेने त्याला मराठीत मण्डूक मुखी (बेडूक तोंड्या) असेही म्हणतात.
दिवसा सहसा नजरेस न पडणारा श्रीलंकन फ्रॉग माउथ या पक्षांचा रंग आणि आकार निसर्गाशी इतका मिळता जुळता आहे की, ते सहजपणे ओळखून येत नाहीत.
तसेच हा निशाचर असून खाद्यासाठी रात्री बाहेर पडतो आणि दिवसा आराम करतो .
सध्या सगळीकडे टाळेबंदी असल्याने वातावरणातील कमालीचा बदल अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामध्ये अतिशय दुर्मिळ असलेल्या वन्यजीवांचा मुक्त संचार चालू असल्याचे जाणवत आहे.
या अगोदर डिस्कवर कोयना टीम ने केरळराज्याचे राज्य फुलपाखरू "मलबार ब्रँडेड पिकॉक" याचे वास्तव्य, अतिशय दुर्मिळ असे "Mountain Imperial Pigeon" (राजकपोत) या पक्ष्याची देखील नोंद केली होती.
सातत्याने केलेल्या पक्षी निरिक्षणावरून हे सिध्द होत होते की, हा पक्षी गेले कित्येक वर्ष इथेच वास्तव्य करत आहे. सध्या च्या कोरोना काळात बाहेर फिरणे बंद असले तरी शेती कामे करताना आजूबाजूच्या मालकी क्षेत्रातील परिसरामध्ये वेगवेगळे संशोधन, निरीक्षण अभ्यास चालूच असतो.
फ्रॉग माउथ हा वन्य जीवांच्या वर्गवारी मध्ये वन्यजीव कायदा 1972 (संरक्षण कायदा ) नुसार क्रमांक एकच्या वर्ग यादी मध्ये येतो, या वर्ग यादी मध्ये वाघ, अजगर, पीसोरी, शार्क, धनेश इत्यादी सारखे दुर्मिळ वन्यजीव येतात.
पक्षी अभ्यासकांसाठी जगातील काही मोजक्याच जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून गणलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र राखीव हे जंगल पक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, हे यावरुन पुन्हा एकदा स्पष्ट होते.
डिस्कवर कोयना टीमने नेहमीच वेगवेगळ्या संशोधना मध्ये, निसर्ग पर्यटन, वणवा निर्मूलन, सापा विषयी जन जागृती, स्थानिक पातळीवरील विषयात अग्रेसर असून वन विभागाच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या गोष्टीसाठी वनविभागाच्या कोयना, चांदोली च्या स्थानिक अधिकारी वर्गाच्या संपर्कामध्ये राहून कार्य करत असते.
श्रीलंकन फ्रॉग माउथचा अधिवास कोयना अभयारण्य क्षेत्रात असणे ही पक्षी मित्रासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात कोयना भागातील वन पर्यटन हे नक्कीच जागतिक दर्जाचे होईल. असे डिस्कवर कोयना आणि सह्याद्री सोशल फौंडेशन संस्थे मधील संग्राम कांबळे, निखिल मोहिते, महेश शेलार, संकेत मोहिते, नरेश शेलार, सागर जाधव, क्षितिज कांबळे, स्वप्नील पाटील आणि कृणाल कांबळे या सदस्यांनी सांगितले .