लातूर : मागील 8 ते 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कमालीचा चढ-उतार झाला आहे. पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. मागील आठवड्यात 6 हजार 200 वर गेलेले दर आता 6 हजार 500 वर स्थिरावले आहे. सोबतच केंद्र सरकारने आता सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनची साठवणूक अजूनही शेतकऱ्यांच्या फायद्याचीच ठरणार आहे. दर स्थिर असले तरीही सोयाबीनची आवक ही 15 हजार पोत्यांवर गेली होती. दिवाळीनंतर आजच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक आवक झाली होती.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आता सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सोयाबीनचे दर नियंत्रणात रहावे म्हणून सोयापेंडची आयात करण्याची मागणी पोल्ट्रीफार्मधारक करीत होते. मात्र, या मागणीला राज्यातील शेतकरी, शेतकरी संघटनानी विरोध केला होता. तर शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांची भेट घेऊन सोयापेंडची आयात केली तर शेतकऱ्यांची काय अडचण होणार हे पटवून सांगितले. त्यामुळे 5 लाख 50 हजार टन सोयापेंडची आयात होणार नसल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.