काही मोबाईल ॲपमुळे मुलांवर परिणाम ; अशा ॲपवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार- दरेकर
मुंबई : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आता एक मुद्दा समोर येत आहे, तो म्हणजे समाज माध्यमांचा लहान मुलांवर होणारा परिणाम. आज विविध समाज माध्यमावर व्हायरल व्हिडिओ, अश्लील क्लिप सहज उपलब्ध असतात यामुळे अशा घटना घडताना दिसतात असं म्हणत अशा समाज माध्यमावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
कोरोना काळात विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असताना त्यांच्या हाती मोबाईल, लॅपटॉप सारखी साधन आली, त्यात काही ॲपच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोहचल्या, अशा ॲपवर केंद्र व राज्य
शासनाने बंदी आणून असे ॲप समाज माध्यमावर काढून टाकण्याची मागणी आपण केंद्र शासनाकडे करणार आहोत असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले. दरम्यान ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मुलांच्या हातात मोबाईल आल्याने मुलं अभ्यासाव्यतिरिक्त काही चुकीच्या गोष्टी तर बघत नाहीत ना याकडे पालकांनी देखील लक्ष देण्याची गरज शिक्षकांनी व्यक्त केली आहे.