#Lockdown : दिव्यांग व्यावसायिकांवर दुहेरी संकट..
राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे. त्यातच दिव्यांग व्यावसायिकांना तर दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांचा ग्राऊंड रिपोर्ट;
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या झपाट्याने वाढ होत असल्याने सरकारने टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे सातारा जिल्ह्यातील दुर्गम आशा पाटण तालुक्यात कराड चिपळूण रस्त्यावर जयवंत कदम यांचा चहा नाश्त्याचा स्टॉल आहे. मात्र कोरोनामुळे आज या व्यवसायावर फार वाईट दिवस आले आहेत. दिव्यांग असूनही कदम यांनी स्वबळावर व्यवसाय करुन कुटुंब चालवले आहे.
कराड चिपळूण रस्त्यावर त्यांचा चहा नाष्ट्याचा स्टॉल टाकला. पत्नीच्या सहाय्याने 1000 ते 1200 रुपये व्यवसाय होत होता. मात्र आता कोरोनाच्या टाळेबंदीत 100 रुपये सुद्धा मिळत नाहीत, असे कदम सांगतात. सरकारने अत्यावश्यक सेवेत हॉटेल पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, रस्त्यावर वाहने नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यात बनवलेले पदार्थ ग्राहक न आल्याने फेकून द्यावे लागत आहेत. कोरोनामुळे बहुतांश लोक हे घरातूनच नाष्टा किंवा जेवण आणतात त्यात हा व्यवसाय पूर्णपणे वाहन चालकांवर अवलंबुन आहे. त्यात सरकारने टाळेबंदी नंतर नोंदणीकृत व्यावसायिकांना 1500 ते 2000 रुपये देण्याची घोषणा जरी केली असली तरी ती सध्या तरी कागदावरच आहे. मात्र 1000 ते 1500 रुपयात कसे घर चालवायचे हा प्रश्न कदम विचारतात, .त्यामुळे येत्या काळात सरकारने यावर विचार करून दिव्यांग व्यावसायिकांना मदत केली नाही तर उपाशी मरण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असेही कदम सांगतात.