मुंबई // मुंबई म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवार आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर येताच, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर, याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने सहा आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती. त्यात औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आलेत.
तर, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळालेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याने आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणावरून भाजपाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवाय, ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.