Shraddha Murder case : अफताबच्या शिक्षेची मागणी करत वकिलांचा कोर्टाबाहेर गोंधळ

Update: 2022-11-17 15:33 GMT

देशभर गाजत असलेल्या श्रध्दा वालकर हत्या प्रकरणी आरोपी अफताबला फाशी देण्याची मागणी करत वकिलांनी दिल्ली कोर्टाबाहेर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.

सध्या देशात श्रध्दा वालकर हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्रध्दा वालकरचा बॉयफ्रेंड अफताब पुनावाला याला ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आरोपी अफताबला फाशी द्या, अशी मागणी करत दिल्ली कोर्टातील वकिलांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातला.

मुंबईतील कॉल सेंटरवर अफताब आणि श्रध्दाची मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र या दोघांच्या प्रेमाला कुटूंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी दिल्लीत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर अफताबने श्रध्दाच्या शरीराचे 35 तुकडे केल्याची घटना मेहरोली परिसरात घडली होती. ही घटना तब्बल सहा महिन्यानंतर उघडकीस आली. त्यामुळे पोलिसांनी अफताबला ताब्यात घेतले आहे.

श्रध्दा वालकर हत्याकांडातील मुख्य आरोपी अफताबला दिल्ली कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र अफताबला फाशी देण्याची मागणी करत वकिलांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातल्याचे समोर आले. यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अफताबला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी अफताबच्या नार्को चाचणीची केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे पुढील तपासासाठी अफताब आणि श्रध्दा गेलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्यामुळे अफताबच्या नार्को चाचणीतून नेमकं काय वास्तव समोर येईल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अफताबने श्रध्दाच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार त्याबरोबरच श्रध्दाचे शीर अजून मिळाले नाही. यासंदर्भात पोलिस तपास सुरु आहे. श्रध्दाच्या हत्येबाबत मला पश्चाताप होत असल्याचे अफताबने सांगितले आहे. मात्र अफताबला फाशीच द्या, अशी मागणी देशभरातून करण्यात येत आहे.

Tags:    

Similar News