महाराष्ट्र एटीएसला ठाणे सत्र न्यायालयाचा दणका : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे द्या
महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उमटवलेलं उद्योगपती मुकेश अंबानी अंटालिया निवास्थानाची स्फोटकं प्रकरण आणि स्फोटकांचा गाडीमालक मनसुख हिरेन याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवून प्रकरण एनआयएला हस्तांतरीत करण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला दिले आहेत.;
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून राज्यात एनआयए विरुद्ध एटीएस असा अघोषित सामना सुरू होता.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपानंतर अंटालिया प्रकरणाला दुसरेच वळण लागले. दरम्यान अंटालिया स्फोटकं प्रकरण एनआयएकडं यापूर्वीच हस्तांतरीत करण्यात आलं आहे.
मुंबई गुन्हे शाखेचे सचिन वाझे या प्रकरणी सध्या एनआयए कोठडीत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं या प्रकरणाचा तपास सुरुच ठेवला होता. अखेर गृहमंत्र्यालयानं मनसुख हिरेन प्रकरणाच्या चौकशी देखील एनआयएकडं दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशांनंतर देखील एटीएसनं या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून मंगळवारी या प्रकरणावर पत्रकार परिषद देखील घेतली होती.
एटीएसनं या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर ठाण्यातील सत्र न्यायालयानेच एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. "मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवा आणि हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करा", असे निर्देश न्यायालयानं आपल्या आदेशात दिले आहेत.