महाराष्ट्रात टीईटी परीक्षेतही घोटाळा? प्रितीश देशमुखच्या घरी आढळून आले 50 ओळखपत्र
पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपरफुटीचे प्रकरण ताजं असतानाच म्हाडाच्या परीक्षेचा पेपरफुटीचा प्रकार समोर आला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. प्रितीश देशमुख याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे टीईटीचे 50 ओळखपत्र आढळून आले आहेत. याच्याकडे टीईटीच्या चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळालेत. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी झाली होती. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर tet च्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली नाही. त्यातच प्रितीश देशमुख याच्या घरी tet च्या विद्यार्थ्यांची 50 ओळखपत्रे सापडल्याने tet परीक्षेत देखील घोटाळा झाला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
म्हाडा पेपरफुटी प्रकरणामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता पेपरफुटी प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एजंट्सकडून आलेल्या परीक्षार्थींना पास करण्यासाठी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख यानं वेगळंच प्लॅनिंग केल्याचं पोलीस तपासामधून समोर आलं आहे. आरोपीला परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रूपये मिळणार होते. याप्रकरणी राज्यभरातून आणखी 10 एजंट्सची नावं समोर आली असून सायबर पोलीस त्यांचा तपास करत आहे.