धक्कादायक! विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळला देशी कट्टा
नांदेड जिल्ह्यातील एका गावात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या दफ्तरातच देशी कट्टा आढळल्याने खळबळ उडाली काय आहे हा धक्कादायक प्रकार वाचा;
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असणाऱ्या कौठा या गावात एका शाळेतील १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात देशी कट्टा आढळल्याने शाळा प्रशासन आणि शिक्षकांना धक्का बसला. विशेष म्हणजे मोठ्या दिमाखात तो वर्गात हा कट्टा मिरवीत होता.
गावातील एका युवा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाच्या वेळी हा सगळा प्रकार लक्षात आला. या प्रकाराबाबत पोलीस दप्तरीही कुठली नोंद नसल्याचे कळते. याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. यासंदर्भात पालकांना विचारले असता, त्यांनी शाळा प्रशासनापुढे दिलगिरी व्यक्त करीत बंदुकीत गोळ्या नव्हत्या ,झालेला प्रकार यानंतर घडणार नाही अशी विनंती मुख्याध्यापकाकडे केली.
शाळेत गावठी कट्टा सापडण्याची नांदेडची ही दुसरी घटना आहे ,याअगोदर नांदेड शहरातील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांकडे गावठी कट्टा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. नांदेडमध्ये गावठी कट्ट्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांत ही चिंतेची बाब बनली आहे..