सोनू निगम यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला
प्रसिध्द गायक सोनू निगम यांच्यावर मुंबईतील कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला.;
प्रसिध्द गायक सोनू निगम (Singer Sonu Nigam) यांच्यावर मुंबईतील चेंबूर येथील कार्यक्रमात हल्ला झाला. यावेळी ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray group) आमदार प्रकाश फातेर्पेकर (MLA Prakash Phatarpekar) यांचा मुलगा स्वप्निल फातेर्पेकर (S phaterpekar) याने सोनू निगम यांना धक्काबुक्की करत स्टेजच्या पायरीवरून ढकलून दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सोनू निगम याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुंबईतील (Mumbai) चेंबूर भागात आमदार प्रकाश फातेर्पेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिव्हलचे (Chembur Festival) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोनू निगम यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. दरम्यान सोनू निगम स्टेजवरून उतरतांना सेल्फीसाठी लोकांनी गर्दी केली. यावेळी आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगमला धक्काबुक्की करत स्टेजवरून ढकलून दिले. यानंतर सोनू निगम खाली पडला. त्यावेळी सोनू निगमचे अंगरक्षक पुढे आले असता त्यांनाही ढकलून देण्यात आले. यामध्ये सोनू निगम आणि आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोनू निगम जखमी झाल्यानंतर त्यांना चेंबूरमधील जैन रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारानंतर सोनू निगमला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर सोनू निगमने चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम 341, 323 आणि 337 च्या अंतर्गत ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातेर्पेकर यांचा मुलगा स्वप्निल फातेर्पेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र स्वप्निल फातेर्पेकर यांनी सोनू निगमवर हल्ला का केला? याचा तपास चेंबूर पोलिस करत आहेत.