लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारकडून 11 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली होती. मात्र, या बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे सिंधुदुर्गात चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात आहेत त्यांनी सिंधुदुर्गातून फोन करुन आम्हाला एकत्र पत्रकार परिषद घ्यायला सांगितले असं राऊत म्हणाले. 11 तारखेला महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खासकरुन लखीमपूरात जो निर्घृण आणि अमानुष असा प्रकार झाला त्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे. या बंदला महाविकास आघाडीचे तीनही घटकपक्ष सक्रीय पाठींबा देत आहेत, असं राऊत यांनी जाहीर केलं आहे.