ज्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करतो, त्यांना कोर्ट दिलासा देते – संजय राऊत
केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांनी तर आता न्यायव्यवस्थेवरही टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार ज्यांच्यावर कारवाई करते, त्यांना कोर्ट दिलासा देत आहे, पण आमच्या नेत्यांना मात्र दिलासा दिला जात नाही, या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारे किरीट सोमय्या हे देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत का, असा टोमणाही त्यांनी मारला आहे. ज्या पद्धतीने सिरीयल किलर असतात रेपिस्ट असतात त्या पद्धतीनेच सोमय्या हे सीरियल कम्प्लेंनन्ट झालेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आपण नागपुरातील उड्डाणपूल, रेल्वे पूल मेट्रोचे पूल, रेल्वे, एअरपोर्ट पाहिले. पण भाजपचे लोक भीक मागतांना दिसले नाहीत. ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागतात, पण भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या देशातले सगळे बिल्डर, उद्योगपती, हवालावाले यांच्या पैशावर भाजप पक्ष जिवंत आहे आणि सरकार चालत आहे, केंद्रीय तपास यंत्रणा हे जर दिसत नसेल तर त्यांचा चष्म्याचा नंबर बदलावा लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.