स्वबळाच्या भाषेतून राज्यात मुदतपूर्व निवडणुका घेण्याची तयारी? सामनामधून शिवसेनेचा सवाल

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेचा समाचार घेण्यात आला आहे.

Update: 2021-06-17 04:04 GMT

courtesy social media

आगामी निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार असे शरद पवार यांनी म्हटल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसने मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. यावरुन आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून काँग्रेस आणि भाजपचा समाचार घेतला गेला आहे. पण त्य़ाचबरोबर अशी स्वबळाची भाषा करणं म्हणजे राज्यात मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा डाव तर नाही ना अशी शंकाही शिवसेनेनं उपस्थित केली आहे. काय म्हणाले आहे या अग्रलेखात ते पाहूया.....

बळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे. महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे. त्यात आणखी भर नको. महाराष्ट्रात रोज एक नवी समस्या उभी राहत आहे. राज्य अस्थिर व्हावे, आर्थिकदृष्टय़ा कमजोर पडावे यासाठी राजकारणातील काही दुष्ट शक्ती टपून बसल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अजीर्ण झाले की ते वाईट

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे.

महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके 'ग्रस्त' असतील असे कधीच वाटले नव्हते. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे. ज्याच्यापाशी 145 आमदारांचे बहुमत आहे त्याचे सरकार बनेल व त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे मत नानांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे, तेही खरेच आहे. संसदीय लोकशाही हा बहुमताच्या आकडय़ांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला जमेल तो गादीवर बसेल. राजकारणात इच्छा, महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? 'मी पुन्हा येईन' असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. ते आले नाहीत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे 105 आमदारांचे बळ वाया गेले आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवले. त्यामुळे 2024 चा हवाला आता कोणीच देऊ नये. नाना पटोले यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱ्या स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला.

नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा करताच भाजपचे तालेवार नेते रावसाहेब दानवे यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची चावी फिरवली. दानवे यांचे म्हणणे आहे की, पुन्हा शिवसेना भाजप युती शक्यच नाही. त्यामुळे स्वबळावरच लढावे लागेल. दानवे पुढे म्हणतात ते महत्त्वाचे, राजकारणात कोण, केव्हा आणि कधी जवळ येईल ते सांगता येत नाही. रावसाहेबांचे हे विधान सोळा आणे सत्य आहे. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रूही नसतो आणि मित्रही नसतो. महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यातून हेच सिद्ध झाले. दानवे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली हे बरे झाले. दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. राज्यातील भाजपमध्ये त्यांचे वजन आहे.

त्यामुळे दानवे बोलतात ते वायफळ नाही हे मान्यच करावे लागेल. 2024 चे मैदान अद्याप लांब आहे, पण प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा अचानक करू लागले आहेत. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीपूर्व लावून घेण्याच्या हालचाली कोणी करत आहे काय? भाजपच्या जवळ जाईल व एकत्र लढतील असा पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही. त्यामुळे भाजपास स्वबळावर लढणे अपरिहार्य आहे. दानवे यांनी तेच सत्य मांडले. स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे?

Tags:    

Similar News