BMC निवडणूक दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव, राज ठाकरेंचा आरोप
मुंबई महापालिका निवडणूक दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेचा सोळावा वर्धापन दिन सोहळा पुण्यात पार पाडला. यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याचा प्रश्न असला तरी निवडणुका पुढे ढकलण्यामागे ओबीसी आरक्षण हेच कारण आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावरही टीका केली. समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे वक्तव्य राज्यपालांनी केले होते. पण इतिहास माहिती नसेल तर का बोलतात, असा सवाल करत राज ठाकरे यांनी राज्यपालांची नक्कल केली. तसेच अशा वक्तव्यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य आणि रामदासांची विद्वत्ता याचे आपण नुकसान करत आहोत, याची जाणीव या लोकांना नाही, अशीही टीका त्यांनी केली.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणेच झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या कार्यक्रमात आपण केवळ ट्रेलर दाखवणार आहोत, खरा पिक्चर गुढी पाडव्याला शिवतीर्थावर असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. जातीच्या नावाने राज्यात राजकारण सुरू असल्याची टीका करत त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांवरही टीका केली. तसेच संजय राऊत यांच्यावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली.