अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर MPSC च्या परीक्षेची तारीख पुढे ढकलल्यानं मोठा गोंधळ उडाला. या गोंधळामुळे सरकारवर विरोधी पक्षाने जोरदार हल्लाबोल केला. या हल्ल्याला शिवसेनेचं मुखपत्र सामनातून उत्तर देण्यात आलं आहे. कोरोनामुळं MPSC ची परीक्षा पुढं ढकलली असल्याचं कारण सरकारने दिलं आहे. तसंच नागपूरमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता. नागपूरमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टिकेला देखील आजच्या सामनातून उत्तर देण्यात आलं आहे.'सोमवारपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात लॉकडाउन करावे लागत आहे. ही वेळा का आली? कोणामुळं आली? करोनासंदर्भात नागपुरात नियमांची कडक अमलबंजावणी करणाऱ्या तुकाराम मुंडे या पालिका आयुक्तांना हटवण्याची मोहीम का राबवली? या प्रश्नांची उत्तरे विरोधी पक्षनेत्यांनीच शोधायची आहेत,' असं म्हणत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करावेत...
एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा व दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे, असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे. आगीत तेल ओतण्याचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत. पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय? विरोधी पक्षहो, आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करीत आहे काय?
काय म्हटलंय आजच्या सामनात...
राज्यलोकसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता 21 मार्चला होईल. सरकारने तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आनंदी झाले असले तरी याप्रश्नी राजकारण करू पाहणाऱ्यांची थोबाडे आंबट झाली आहेत. 'एमपीएससी' परीक्षा 14 मार्चला होणार होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलल्याचे जाहीर होताच पुण्यातील रस्त्यांवर स्पर्धा परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्याच्या इतर भागांतही तुरळक आंदोलने झाली. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधी पक्षनेते करीत होते, पण तेलात भेसळ असल्याने आंदोलन पेटण्याआधीच विझले. सरकारने आता लगेच परीक्षेची नवी तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले आहे. ग्रामीण भागात परीक्षा रद्द होणे म्हणजे किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाच माहीत. या परीक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण कोरोनाचा वाढता संसर्ग असेच आहे. मदत व पुनर्वसन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास कोरोनाच्या स्थितीबाबत पत्र पाठवले. त्यावर आयोगाने सचिव स्तरावर निर्णय घेतला. त्या निर्णयाविरुद्ध उद्रेक झाला तेव्हा 'आयोग' आणि सचिव मंडळ पळून गेले व आग विझवायला मंत्र्यांनाच यावे लागले. सचिवांनी घेतलेल्या इतक्या मोठय़ा निर्णयाची माहिती मंत्र्यांना नव्हती. त्यातून गोंधळ निर्माण झाला. त्या गोंधळाचे नेतृत्व विरोधी पक्षाने करण्याचा मोका साधला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन हस्तक्षेप करावा लागला. यावरून सरकारवर शेरे-ताशेरे मारले जात आहेत. या सगळय़ा प्रकरणास जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही महाभागांनी केला
भ्रमात कोणी असेल तर
त्यांनी डोळय़ांवर थंड पाणी मारून जागे व्हावे हेच बरे. आपले सरकार तीन महिन्यांत येईलच येईल, असे भाजप पुढारी जागेपणी बडबडू लागले आहेत. ते अशी तरुणांची माथी भडकवून शक्य होणार आहे काय? महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे व त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच चिंता व्यक्त केली. हे संकट असेच वाढत राहिले तर नाइलाजाने कडक 'लॉक डाऊन' लादावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामागची भावना विरोधी पक्ष समजून घेणार नसेल तर त्यांचे राजकारण मानवतेचे उरले नसून त्यांच्या राजकारणात वैफल्यातून निर्माण झालेली अमानुषता स्पष्ट दिसू लागली आहे. सोमवारपासून विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या नागपुरातच 'लॉक डाऊन' करावे लागत आहे.
ही वेळ का आली? कोणामुळे आली? कोरोनासंदर्भात नागपुरात नियमांची कडक अंमलबजावणी करणाऱ्या तुकाराम मुंढे या पालिका आयुक्तांना हटविण्याची मोहीम का राबविली गेली? या प्रश्नांची उत्तरे विरोधी पक्षनेत्यांनीच शोधायची आहेत. एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा व दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे, असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे. आगीत तेल ओतण्याचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत. पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय? विरोधी पक्षहो, आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करीत आहे काय?