राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला शिवप्रेमींच्या भावनांचा आदर ; किल्ले रायगडावर हेलिकॉप्टर उतरणार नाही
रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 6 डिसेंबर रोजी शिवदर्शनासाठी किल्ले रायगडावर येत आहेत. त्या अनुषंगाने मागील अनेक दिवसांपासून प्रशासनाची तयारी सुरू आहे. दरम्यान सुरुवातीला राष्ट्रपती कोविंद यांचे हेलिकॉप्टर थेट किल्ले रायगडावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याला शिवप्रेमींनी विरोध दर्शविला होता. किल्ले रायगडावर हेलिकॉप्टर उतरल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर धुरळा व कचरा उडणार असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हॉलीकॅप्टर गडावर उतरवू नये अशी मागणी कोकण कडा मित्र मंडळ व तमाम शिवप्रेमी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. शिवप्रेमींचा विरोध व त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रपती हे किल्ले रायगडावर न उतरता रोपवे ने गडावर जाणार असल्याची माहिती खासदार संभाजी राजे भोसले यांनी ट्विट द्वारे दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस सॅल्युट करतो, अशा आशयाचे ट्विट खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केले आहे.
त्यामुळे शिवप्रेमींच्या मागणीला यश आले आहे. तर 25 वर्षांपूर्वी शिवप्रेमींनी आमरण उपोषण करून गडावरील हेलिपॅड उखडून फेकून दिले होते, आता राष्ट्रपतींच्या या भूमिकेने गडावर कधीच हेलिकॉप्टर उतरणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.