राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, रायगडमधील शिवसैनिकांची उद्योगमंत्र्यांकडे तक्रार

Update: 2021-09-22 13:17 GMT

रायगड : माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला आहे. खासदार व पालकमंत्र्यांवर शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर उद्योगमंत्री सुभाष देसाईंपुढे या कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला.

एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्री, शिवसेनेचे तीन आमदार असून राष्ट्रवादीची कुरघोडी, त्यामुळे राष्ट्रवादी सोबत आघाडी नकोच अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी देसाई यांच्यापुढे मांडली आहे. शिवसेना ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथे थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ही बोचरी टीका राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागली, त्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेनेत असलेली अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. गीते यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेत्यांनाही स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी रायगडात यावे लागले. शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी माणगाव येथे तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी सेनेचे आजी-माजी आमदार तसेच पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. देसाई यांनी आगामी स्थानिक निवडणूकांबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

रायगड जिल्ह्यात कुठल्याही पक्षासोबत आघाडी करायला सांगा पण राष्ट्रवादीसोबत जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेसह आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणूका स्वबळावरच लढवून भगवा फडकवू, असा विश्वास त्यांनी दिला आहे. रायगडात आमदार जास्त असतानाही पालकमंत्रीपद मात्र एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला मिळाले, याचे शल्य आमदारांसह शिवसैनिकांना आहे. त्यात पालकमंत्री आणि खासदार कुरघोडीचे राजकारण करतात, आमदारांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी शिवसेनेकडून केल्या जात आहेत."

राज्यात महाआघाडी असली तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत जाण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. वेळ पडलीच आणि युती आघाडी करायची वेळ आली तर अन्य कुठल्याही पक्षासोबत युती करायला सांगा; पण राष्ट्रवादी नकोच, अशी स्पष्ट भूमिका या बैठकीत मांडली असल्याचे समजते. रायगडात आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News