मुंबईतील क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटके असलेल्या आर्यन खानच्या समर्थनार्थ आता शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या समर्थनार्थ तिवारी यांनी कोर्टात याचिका दाखल केली असून आरोपीच्या मूलभूत हक्कांचा हवाला दिला आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्याकडे या प्रकरणी स्वत: लक्ष देण्याची विनंती केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी त्यांनी आली आहे. या प्रकरणात नॉरकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
आर्यनच्या जामीन अर्जावर 20 ऑक्टोबर रोजी निर्णय मुंबईतील NDPS कोर्ट देणार आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या वकिलांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर सुनावणी झाली आहे. न्यायालय 20 ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहे. या प्रकरणी आर्यन खान, मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन त्याचा मित्र अरबाज मर्चंटसोबत रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज घेणार होते आणि अरबाजकडे ड्रग्ज सापडले आहे असा दावा NCBने कोर्टात केला आहे.