शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांवर चांगलीच आगपाखड केली आहे,'शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसनं आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर 'जय जवान, जय किसान'चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं!, अशा शब्दात खासदार राऊत यांनी तोफ डागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं जातं, याबाबत आवाज उठविण्याऐवजी प्रसार माध्यम आर्यन खानच्या पाठीमागे धावत आहे, असा आरोप करत खासदार राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील घटनेवरुन राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडत पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं आहे.
पंतप्रधान मोदी कमालीचे संवेदनशील, उ.प्रदेशात शेतकरी चिरडले, त्यांनी संवेदनाही व्यक्त करु नये, याचं आश्चर्य वाटतं असं राऊत म्हणाले.
हिंदुस्थान ज्या चार स्तंभांवर टिकून आहे ते स्तंभ भय आणि दहशतीच्या वाळवीने पोखरले गेले आहेत. त्यामुळे लोकशाहीबाबतची चिंता वाढू लागते. लखीमपूर खेरी जिल्ह्यात आंदोलक शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालून त्यांना चिरडून मारण्याचा प्रकार घडला आहे. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमालीचे संवेदनशील त्यामुळेच अनेकदा पंतप्रधान मोदी हे जाहीरपणे अश्रू ढाळताना जगाने पाहिले आहे. शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्यानंतर त्यांनी संवेदना व्यक्त करू नयेत याचे आश्चर्य वाटते.असं राऊत म्हणाले.
कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. त्यांचा आक्रोश ऐकायला सरकार तयार नाही. गाझीपूरच्या सीमेवर लोखंडी पिंजरे चारही बाजूंनी उभे करून शेतकऱ्यांना बंदिवान बनवून ठेवले. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. अश्रुधूर, लाठ्या चालविल्या गेल्या. हरियाणात गोळीबार करण्यात आला आणि तेही कमी पडले तेव्हा त्यांच्यावर भरधाव गाड्या घालून चिरडून मारले. या बातमीची आग मीडियाच्या छोट्या पडद्यावर आणि वृत्तपत्रांच्या कागदावर पेटलेली दिसली नाही. असं म्हणत 'लखीमपूर खेरी' घटनेने देशाची मान शरमेने खाली गेली आहे.असा घणाघात खासदार राऊत यांनी केला.