चीनने गलवानच्या खोऱ्यात झेंडा फडकवल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक ; पंतप्रधानांवर निशाणा

गलवानच्या खोऱ्यात चीनने भारतीय भूमीवर स्वत:चा झेंडा फडकवल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावरही जोरदार निशाणा साधलाय. अगदी अत्तर व्यापाऱ्याला अटक झाल्यासारख्या मुद्द्यावर भाष्य करणारे पंतप्रधान चीनच्या मुद्द्यावर काही बोलत कसे नाही?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला;

Update: 2022-01-04 02:59 GMT

मुंबई // गलवानच्या खोऱ्यात चीनने भारतीय भूमीवर स्वत:चा झेंडा फडकवल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावरही जोरदार निशाणा साधलाय. अगदी अत्तर व्यापाऱ्याला अटक झाल्यासारख्या मुद्द्यावर भाष्य करणारे पंतप्रधान चीनच्या मुद्द्यावर काही बोलत कसे नाही?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. घरात बाता व सीमेवर लाथा अशी आमची अवस्था चीनच्या बाबतीत दिसत आहे हे चित्र धक्कादायक असल्याचं शिवसेनेनं सामनातून म्हटले आहे.

सोबतच शिवसेनेने म्हटले आहे की, "पंतप्रधान मोदींसह त्यांचे अर्धे मंत्रिमंडळ नेहमीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग झालेत. पण याच काळात पूर्व लडाखजवळील गलवान व्हॅलीत लाल चिनी घुसलेत. नववर्षदिनी चिन्यांनी त्यांचा राष्ट्रध्वज गलवान खोऱ्यात फडकवून भारताच्या सार्वभौमत्वास आव्हान दिले. चीन सरकारने भारताच्या हद्दीत फक्त त्यांचा झेंडाच फडकविला असे नाही, तर या ध्वजारोहण सोहळ्याचे संपूर्ण चित्रीकरण करून तो व्हिडीओ अधिकृतपणे प्रसारित केला आहे," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारातील प्रमुख लोकांनी चिन्यांच्या या घुसखोरीवर साधे शाब्दिक आक्रमणही केले नाही. भाजपाच्या आय.टी., सायबर फौजाही या प्रश्नी शरणागतीचे पांढरे निशाण फडकवून बसल्यात. असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.

उत्तर प्रदेशातील एका अत्तर व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने धाडी घालून शे-दोनशे कोटी रुपये पकडले. त्यावर पंतप्रधान व त्यांचे सहकारी जाहीर भाषणे ठोकतात, पण गलवान व्हॅलीत चिन्यांनी झेंडा फडकविला यावर बोलत नाहीत. "चीनची घुसखोरी अरुणाचल, उत्तराखंड, सिक्कीम प्रांतातही सुरू आहे. अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांची नावे चीनच्या नकाशावर परस्पर बदलून चिन्यांनी आपली कळ काढली आहे, पण पाकड्यांची कळ जेवढी जोरात लागते तेवढी चिन्यांची लागत नाही. याचे कारण असे की, पाकिस्तानशी संघर्ष केला की भारतात निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुसलमान असा झगडा पेटवता येतो. त्यामुळे पाकड्यांना दम भरणे, डोळे वटारणे, एखादा सर्जिकल स्टाईक करून शौर्य गाजविण्याचा आव आणणे सोपे असते. चीनच्या बाबतीत ते सोपे नाही. चीन ही एक स्वयंभू महासत्ता आहे. त्यामुळे चीनने कितीही घुसखोरी केली तरी लालभाईंच्या बाबतीत भारत संयम आणि सबुरीनेच घेणार आहे. चीनने आपल्या वीस सैनिकांचे बळी घेतले तरी उद्या पुन्हा एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादेत येऊन आमच्या पंतप्रधानांबरोबर झोपाळ्यावर झुलताना व फाफडा, ढोकळा खाताना दिसतील; कारण चीन हे एक सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आर्थिक तसेच लष्करी आहे," असं शिवसेनेनं म्हटलंय

Tags:    

Similar News