आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची बॅनरबाजी ; राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Update: 2021-12-12 03:39 GMT

मुंबई  : भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतं आहे. त्यातच या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू आहे. आता शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत आशिष शेलार यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीमध्ये शिवसेनेनं आशिष शेलार यांची खिल्ली उडवली आहे.

मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आली आहे

'कसं काय शेलार बरं हाय का?

काल काय एैकलं ते खरं हाय का ?

काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला?

असं या बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान आशिष शेलार यांनी यावर म्हटले की, मी माझी भूमिका त्या दिवशीही स्पष्ट केली. त्यानंतर सोशल मीडियातही याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मी कुठल्याही व्यक्तीला, महिलेला, महापौरांना उद्देशून किंवा नाव घेऊन ते वाक्य उच्चारलं नाही. व्यवस्थेच्या विरोधात आक्रोश हा अंगावर आल्यावर त्यापासून लपवण्यासाठी स्वत:च्या अंगावर ओढवून घेण्याचं काम शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या लोकांनी केलं.

Tags:    

Similar News