'भाजपच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी'; सामनातून ओवेसींवर निशाणा

Update: 2021-09-27 03:09 GMT

मुंबई : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच या निवडणुकीमध्ये एमआयएमआयएमने पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमआयएम

प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. यावरूनच शिवसेनेने सामनातून ओवेसींवर निशाणा साधला आहे. 'फोडा-झोडा व जिंका' असं म्हणत सामनातील अग्रलेखामधून ओवेसी यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय घडेल , काय काय पाहावे लागेल हे सांगता येत नाही. भाजपच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे असं समानातून म्हटले आहे. युपीतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसी महाशयांनी केलेली दिसते, असं म्हणत सामनातून ओवेसी हे भाजपासाठीच काम करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

दरम्यान "दोन दिवसांपूर्वी ओवेसी हे प्रयागराजवरून लखनौला जात असताना वाटेत त्यांचे समर्थक जमले व त्यांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे लावले. इतके दिवस उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे नारे लागल्याची नोंद नाही, पण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ओवेसी येतात काय, ठिकठिकाणी भडकावू भाषणे करतात काय, त्यांच्या बेबंद समर्थकांची डोकी भडकवतात काय आणि मग 'पाकिस्तान झिंदाबाद'ची नारेबाजी सुरू होते काय, हे सर्व पटकथालेखन ठरवल्याप्रमाणे सुरू असल्याच्या संशयास बळकटी येत आहे," असं सामनाच्या संपादकिय मधून म्हटले आहे.

Tags:    

Similar News