कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या विटंबनेवरून शिवसैनिकांनी घेतली अमित शाहांची भेट

कर्नाटक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत शिवसैनिकांनी पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.;

Update: 2021-12-20 02:08 GMT

पुणे// कर्नाटक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत शिवसैनिकांनी पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शिवसैनिकांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांना निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी केली. अमित शाह यांनी शिवसैनिकांचं निवेदन स्विकारत म्हटले की, "या प्रकरणात मी लक्ष घातले आहे. माझे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे, दोषींवर कारवाई होईल."

पुणे दौर्‍यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांची शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, किरण साळी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली. अमित शाह यांनी देखील शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्विकारले आणि कारवाईचं आश्वासन दिलं. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमचेच नाहीत, तर अवघ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही.अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भावना व्यक्त केल्या होत्या. सोबतच कर्नाटक मधील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी त्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. मागील कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे." अशा शब्दांत त्यांनी भाजप शासित कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता.

Tags:    

Similar News