राज ठाकरेंना अटक होणार का?, सांगली कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट जारी
भोंग्यांच्या प्रकरणावरून अडचणीत आलेल्या राज ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात सांगली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत जी भुमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढलेल्या असतानाच सांगली न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट एप्रिल महिन्यात काढण्यात आले होते. मात्र त्या प्रकरणात पोलिसांनी राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.
राज ठाकरे यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट 2008 साली दाखल करण्यात आले होते. त्या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 109, 117 आणि 143 याबरोबरच मुंबई पोलिस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
काय आहे प्रकरण?
राज ठाकरे यांनी 2008 साली रेल्वे भरतीत स्थानिक भुमीपुत्रांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. या प्रकरणात कल्याण न्यायालयाने राज ठाकरे यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. मात्र राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी या गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला होता. तसेच जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात आले होते. या प्रकरणात शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर राज ठाकरे आजपर्यंत शिराळा कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे शिराळा कोर्टाने अखेर राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तर हे वॉरंट 6 एप्रिल रोजी काढण्यात आले होते. मात्र त्यावर मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याविरोधात जारी केलेल्या 10 वर्षांपुर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना अटक होणार का? अशी चर्चा सुरू आहे.