“शिंदे सरकारने क्रिकेटपटूंना ११ कोटींचे बक्षीस अद्याप दिले नाही"; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप!
जून महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार केला होता. तसेच त्यांना ११ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केलं होतं. त्यावेळी सरकारच्या या निर्णयाची बरीच चर्चाही झाली होती. मात्र, आता भारतीय संघातील खेळाडूंना बक्षिसांची ही रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावरून राज्य सरकारवर टीकाही केली आहे.
राज्य सरकारने केली होती ११ कोटींच्या बक्षिसाची घोषण
दरम्यान, टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर राज्य सरकारने विधीमंडळात मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. “भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केलं आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी, अशी कामगिरी केली आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या विजेत्या संघातील खेळाडूंना कोट्यवधी रूपयांची बक्षिसे जाहीर केली. मात्र, ही रक्कम त्यांना अद्यापही मिळालेली नाही. काल आम्ही ज्या हॉटेलमध्ये मिटींगसाठी थांबलो होतो. त्या हॉटेलमध्ये विश्वचषक विजेत्या संघातील काही खेळाडू मला भेटले. बोलता-बोलता त्यांनी सांगितलं की आम्हाला जी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, ती अद्याप मिळालेली नाही. ही बाब खटकणारी आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“अशाने सरकारची प्रतिमा मलिन होतेय”
पुढे बोलताना त्यांनी यावरून राज्य सरकारवर टीकाही केली. “माझी महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की, इथे – तिथे पैसे वाटतच आहात. तर ज्यांना कबूल केले आहेत. त्यांचे तरी पैसे वाटून टाका. जसे हे क्रिकेटपटू मला बोलले, तसे ते अनेकजणांना बोलले असतील. त्यातून सरकारची प्रतिमा मलिन होतेय, याचीच मला काळजी आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.